संस्थेविषयी

संचालकांचे मनोगत

डॉ. राजकुमार अवसरे

डॉ. राजकुमार लक्ष्मीप्रल्हाद अवसरे

M.Sc. Phy., M.Ed., M.B.A., Ph.D.

संचालक

राज्य विज्ञान शिक्षण संस्था

(प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर.

विज्ञान हे केवळ पाठ्यपुस्तकातील विषय नसून, ते विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची, निरीक्षण करण्याची, प्रयोग करण्याची आणि समस्यांवर तर्कशुद्ध पद्धतीने उपाय शोधण्याची जीवनपद्धती आहे. विद्यार्थ्यांच्या मनात ही वैज्ञानिक दृष्टी रुजविणे आणि त्यांना भविष्यातील ज्ञानाधिष्ठित समाजासाठी सक्षम करणे, हे राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरचे मूलभूत ध्येय आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेली राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) ही विज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात दीर्घकाळापासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. संस्थेची स्थापना सन १९६८ मध्ये पुणे येथे करण्यात आली आणि १ एप्रिल १९८० पासून संस्थेचे कामकाज नागपूर येथे सुरू झाले. पुढे १७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रादेशिक विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली.

आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे पुरेसे नाही. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, नवोपक्रमाची वृत्ती आणि संशोधनाची जिज्ञासा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांमधून याच दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत.

राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी, पश्चिम भारत विज्ञान जत्रा, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव, विज्ञान मंच, ग्रामीण विज्ञान छंद मंडळे, शिक्षक प्रशिक्षण, INSPIRE MANAK यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवाशी जोडण्याचे कार्य संस्था करीत आहे.

INSPIRE MANAK सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नवोपक्रमक्षमतेला व्यासपीठ मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील समस्या ओळखून त्यावर वैज्ञानिक व नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत, या दृष्टिकोनातून अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रासाठी राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही या योजनेची State Nodal Agency म्हणून कार्य करते.

विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. प्रयोग, प्रतिकृती, प्रकल्प आणि शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या कल्पना मांडतात. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही विकास होतो.

त्याचप्रमाणे विज्ञान नाट्योत्सव हा विज्ञान आणि संस्कृतीचा सुंदर संगम आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून वैज्ञानिक साक्षरतेचा प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती आणि विद्यार्थ्यांच्या अभिनय क्षमतेला वाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होते.

आज राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या पार्श्वभूमीवर विज्ञान शिक्षणाला अधिक अनुभवाधारित, प्रयोगशील आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्याची गरज आहे. डिजिटल लॅब, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय विचार, नवोपक्रम आणि संशोधनवृत्ती यांचा शिक्षण प्रक्रियेत प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रे, ISRO आणि NASA यांसारख्या वैज्ञानिक संस्थांशी प्रत्यक्ष परिचित होण्याची संधी मिळते.

आमचे उद्दिष्ट स्पष्ट आहे—महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत विज्ञान पोहोचविणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न निर्माण करणे, प्रत्येक प्रश्नामागे शोधाची प्रेरणा निर्माण करणे आणि प्रत्येक कल्पनेला नवोपक्रमाचे रूप देण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासा, कल्पकता आणि वैज्ञानिक क्षमता ही आपल्या राज्याची मोठी संपत्ती आहे. ग्रामीण, आदिवासी, दिव्यांग तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत विज्ञान शिक्षण अधिक समावेशक, आनंददायी आणि प्रयोगशील करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.

“प्रश्नातून जिज्ञासा, जिज्ञासेतून प्रयोग, प्रयोगातून ज्ञान आणि ज्ञानातून नवोपक्रम”

या विचाराने आपण पुढे जात राहूया. राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर ही केवळ एक शासकीय संस्था नसून वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या भावी महाराष्ट्राच्या निर्मितीचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून अधिक सक्षम, आधुनिक आणि गतिमान करण्याचा आमचा संकल्प आहे.

या कार्यासाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे, विविध राष्ट्रीय संस्था, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

विज्ञान शिकूया, विज्ञान जगूया आणि विज्ञानाच्या माध्यमातून विकसित, ज्ञानसमृद्ध व आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवूया!

संस्थेची पार्श्वभूमी व इतिहास

राज्य विज्ञान शिक्षण संस्था,
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर

संस्थेची पार्श्वभूमी व इतिहास

केंद्र शासनाच्या शालेय विज्ञान शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने सन १९६८ मध्ये पुणे येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि १ एप्रिल १९८० साली नागपूर येथे स्थलांतरित करण्यास आली.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी संलग्न असलेल्या कार्यालयांच्या विकेंद्रीकरणामुळे १ एप्रिल १९८० पासून ही संस्था नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आली; आणि तेव्हापासून रवीनगर, नागपूर येथून संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

त्यानंतर, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली (पूर्वीचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे). दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विभागस्तरावर पाच प्रादेशिक विद्या प्राधिकरणे (नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व मुंबई) निर्माण करण्यात आली. या पुनर्रचनेनुसार राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे नामकरण प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर असे करण्यात आले.

संस्थेची माहिती
स्थापना वर्ष (मूळ संस्था, पुणे) सन १९६८
नागपूर येथे स्थलांतर १ एप्रिल १९८०
सध्याचे ठिकाण रवीनगर, नागपूर
पुनर्रचना शासन निर्णय १७ ऑक्टोबर २०१६
सध्याचे नामाभिधान प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर
राज्यातील समकक्ष प्राधिकरणे नागपूर
अमरावती
नाशिक
औरंगाबाद
मुंबई

संस्थेची प्रमुख उद्दिष्टे

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर ही विज्ञान शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. संस्थेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :

  • ✔ विज्ञान शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे.
  • ✔ विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीचा परिपोष करणे.
  • ✔ विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे.
  • ✔ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विद्यार्थी, शिक्षक व जनसामान्यांमध्ये प्रसार करणे.
  • ✔ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंत विज्ञान व गणित अध्ययन-अध्यापनाचे संसाधन निर्माण करून प्रशिक्षणे आयोजित करणे.

संस्थेचा कालक्रम

१९६८

संस्थेची स्थापना

पुणे येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली.

१९८०

नागपूर येथे स्थलांतर

१ एप्रिल १९८० रोजी संस्था रवीनगर, नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आली.

२०१६

पुनर्रचना

शासन निर्णयानुसार प्रादेशिक विद्या प्राधिकरणांची स्थापना करण्यात आली.

सद्यस्थिती

राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण ),

रवीनगर, नागपूर येथून म्हणून कार्यरत.

सहयोगी शासकीय प्राधिकरणे, संस्था व समन्वय यंत्रणा

राष्ट्रीय व राज्यस्तरीय भागीदार संस्था

आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्था राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेक शासकीय प्राधिकरणे, प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आणि क्षेत्रीय शासकीय यंत्रणांशी समन्वय राखून कार्य करते.

संस्था / प्राधिकरण ठिकाण
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST) भारत सरकार, नवी दिल्ली
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) नवी दिल्ली
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM) कोलकाता
डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई
नेहरू विज्ञान केंद्र वरळी, मुंबई
रामन विज्ञान केंद्र नागपूर
IISER (Indian Institute of Science Education and Research) पुणे
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे
National Innovation Foundation (NIF) अहमदाबाद

संस्थेमार्फत राबविले जाणारे प्रमुख उपक्रम

वरील भागीदार संस्थांच्या सहकार्याने राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर खालील उपक्रम व योजना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर राबविते. प्रत्येक उपक्रमाचा सविस्तर तपशील प्रकरण ५ मध्ये दिलेला आहे.

  • राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी
  • पश्चिम भारत विज्ञान जत्रा
  • अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा
  • राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव
  • विज्ञान मंच योजना
  • राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद प्रदर्शन
  • ग्रामीण विज्ञान छंद मंडळे
  • राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTSE) — विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबीर
  • INSPIRE MANAK योजना
  • अगस्त्या फाउंडेशन, कुप्पम, बंगळुरू यांच्या करारांतर्गत माध्यमिक शाळेतील गणित व विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे गणित व विज्ञान विषयाचे प्रशिक्षण

क्षेत्रीय शासकीय समन्वय अधिकारी

उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था जिल्हा व विभागस्तरावरील खालील शासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कार्य करते :

अ. क्र. अधिकारी
१ मा. जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य
२ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,महाराष्ट्र राज्य
३ मा. विभागीय शिक्षण उपसंचालक
४ शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / शिक्षण निरीक्षक / महानगरपालिका)
५ संस्थेचे प्रतिनिधी — विभागस्तरावर विज्ञान सल्लागार व जिल्हास्तरावर विज्ञान पर्यवेक्षक
६ जिल्हा समन्वयक (प्रत्येक जिल्ह्यातील कृतिशील शिक्षक)